Hanuman – utkat swami bhakti che adarsha udhaaran

Contents


१. हनुमान: अर्थात्‌ उत्‍कट स्‍वामीभक्ति व प्रखर स्‍वामीनिष्‍ठा

Lord Hanuman

दास्यभक्‍तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अजूनही मारुतीच्या रामभक्‍तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरिता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव तयार असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व व ब्रह्मत्व  यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक व सैनिक यांचे मिश्रण ! हनुमान म्हणजे भक्‍ती व शक्‍ती यांचा संगम !

१.१ भाव

एकदा सीतेने स्नानानंतर कपाळावर शेंदूराचा टिळा लावला. हनुमानाने त्याचे कारण विचारता सीता म्हणाली, ‘त्यामुळे तुमच्या स्वामींचे आयुष्य वाढते.’ तीच गोष्ट हनुमानाने लक्षात ठेवली आणि त्याने आपल्या सर्वांगाला शेंदूर फासला !

१.२ दास्‍य

हा श्रीरामापुढे हात जोडून उभा असतो. त्याचे मस्तक किंचित पुढे झुकलेले व पाय जुळवलेले असतात. त्या वेळी त्याची शेपटी जमिनीवर रुळलेली असते.

१.३ अनोळखी रुपातील स्‍वामींच्‍या प्रथम दर्शनानेच भारावणे

पंपासरोवरावर धनुर्धारी राम व लक्ष्मण असतात. ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीव असतो. वालीची त्याला विलक्षण दहशत असते. गिरीशिखरावरून सुग्रीव हे दोघे नवे तेज:पुंज शस्त्रधारी कुमार पहातो. `वालीचेच ते हेर आहेत, मारेकरी आहेत’, असे त्याला मनोमन वाटते. सुग्रीव थरथरतो. हनुमंत त्याचा सखा आणि मंत्री आहे. त्याच्याजवळ तो आपले मनोगत सांगतो, `वालीने पाठवलेले हे दोघे मारेकरी आहेत. वाली राजा आहे. राजाला असंख्य मित्र असतात. या दोघा नवख्या तरुणांचा शोध घेतला पाहिजे. त्यांचे अंतरंग जाणले पाहिजे. हनुमंता, तू शोध घे ! वालीचेच जर ते हेर असतील, तर मला संकेत कर. लगोलग मी मंत्र्यांसह इथून पळून जाईन. कुठेतरी अन्यत्र जागा घेईन.’ हनुमान राम व लक्ष्मण यांना पर्वतावरूनच पहातो, न्याहाळतो. त्याला ओळख पटत नाही; पण त्याचा उजवा डोळा, उजवा बाहू, उजवे अंग स्फुरत असते, फडकत असते. डोळयांत अश्रू तरळतात आणि अजाणता, नकळत त्याचे अंत:करण राम व लक्ष्मण यांच्याकडे विलक्षण ओढ घेत असते. `असे का होते’, ते हनुमानालाही कळत नाही.हनुमान ब्राह्मणवेश घेऊन पंपासरोवरावर येतो व राम आणि लक्ष्मण यांच्याजवळ जातो. आत हनुमंताची अवस्था विलक्षण असते. त्याचे अंगांग मोहोरते, डोळे पाणावतात व हृदय थरथरते. `काहीतरी अघटित घडणार’, असे त्याच्या अंतर्मनाचा कण्नकण् सांगत असतो. हनुमंत झुकतो. रामचरणी माथा ठेवतो. अत्यंत विनयाने संभाषण करतो, ‘आपण कोण क्षत्रियकुमार आहात? साधारण पुरुष इतका तेजोमय कधी असूच शकत नाही. आपले तेज, आपली कांती असामान्य आहे.’

१.४ भक्तलक्षणांनी श्रीरामही अचंबित होणे

हनुमानाचे मनोहर आणि मधूर भाषण सुरूच असते. रामप्रभु एकाग्रतेने ते ऐकत असतात. ब्राह्मणरूपाने आलेल्या हनुमंताचे रूप आणि एकंदर व्यक्‍तिमत्त्व ते न्याहाळून पहातात, रोखून पहातात, बोलत मात्र काहीच नाहीत. हनुमंतालाही या गोष्टीचे आश्चर्य वाटते. थोडा वेळ तो बोलतो आणि गप्प होतो. तो बोलत रहावा; म्हणून श्रीरामप्रभु ब्राह्मणाला पुढे बोलणे सुरू ठेवायला सांगतात. हे सांगतांनाच हनुमंताच्या संभाषणाविषयी आणि एकंदर व्यक्‍तिमत्त्वाविषयी लक्ष्मणाला सांगतात, `लक्ष्मणा, वेदांचा अभ्यास न केलेल्या कोणालाही असे भाषण करता येणे शक्य नाही. संपूर्ण व्याकरण याने अनेक वेळा ऐकलेले असावे; कारण हा पुष्कळ बोलत होता, तरी अशुद्ध एकही शब्द त्याच्या मुखातून निघालेला नाही. भाषणात उगाच पाल्हाळ नाही. ते संदिग्ध नाही. अस्खलित आहे. ऐकणार्‍याला कंटाळा आणणारे नाही. मनात आधी उत्कृष्ट रीतीने प्रविष्ट होऊन नंतरच याचे भाषण कंठविवरापासून श्रोत्यांच्या कानावर पडत असल्यामुळे त्याचा उच्चार मध्यम रीतीने होतो आहे. त्या त्या स्वरवर्णाचे संस्कार क्रमाने अंत:करणावर ठसवण्याला समर्थ आहेत. याची वाणी, याचे संभाषण त्वरारहित आहे. विलंबशून्य आहे; म्हणूनच मनाला आनंद देणारे आहे. ऊर, कंठ आणि शिर या तिन्ही ठिकाणी अभिव्यक्‍त होणार्‍या याच्या अद्‌भुत वाणीने, खड्ग उपसून तत्पर असलेल्या शत्रूचे हृदयही बदलेल. तो याची स्तुतीच करील. अशा प्रकारचा दूत ज्या राजापाशी असेल, त्याची कोणती कामगिरी कशी अयशस्वी होईल? अशा गुणांचा कार्यसाधक ज्याच्याजवळ असेल, त्याचे मनोरथ सिद्धीस जातीलच. लक्ष्मणा, तू याच्याशी बोल.’

१.५ श्रीरामाच्या प्रथम भेटीच्या वेळी हनुमंताचा भाव जागृत होणे

लक्ष्मण श्रीरामप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे हनुमंताशी बोलतो. `आम्ही दोघे अयोध्येचा राजा दशरथाचे कुमार ! हा माझा मोठा भाऊ श्रीराम, मी लक्ष्मण ! आम्ही विरक्‍त आहोत. चौदा वर्षांच्या वनवासाला आलो आहोत ! श्रीरामाच्या पत्‍नीला सीतादेवीला कुणी राक्षसाने पळवून नेले आहे. या गहन वनात आम्ही तिचाच शोध घेतो आहोत ! तुम्ही कोण?’ श्रीरामप्रभुवर हनुमंतांची दृष्टी खिळलेली असते. माथी जटा, कांती श्यामवर्णाची, भुवनमोहन रूप असे अद्‌भुत सौंदर्य ! सौंदर्याचाच ओतीव पुतळा. हनुमंत नेत्रांनी ते अद्‌भुत रामरूप पित होता. त्याचे रोम रोम रामरूप प्राशन करीत होते. नेत्रांत अश्रू असतात. अंगांग मोहोरलेले असते, पुलकीत असते. व्याकुळ हनुमंत श्रीरामचरणी माथा ठेवतो. अंजनेयाच्या अश्रूला विराम नसतो, वाणी अवरुद्ध असते. 

१.६ प्रभु श्रीरामाने हनुमंताचा स्वीकार करणे

हनुमंताला ब्राह्मणवेशाची स्मृतीच उरत नाही. ब्राह्मणवेशाचे अवधानच उरत नाही. हनुमंत परम संवेदनशील होतो. त्याचे ब्राह्मण वेशाचे ते आवरण आपोआप दूर होते. वास्तविक रूप प्रगटते. रामप्रभुचरणी हनुमंत माथा ठेवतो. अश्रू ढाळतो. रामचरणी प्रार्थना करतो. हनुमंताचे आवरण हटते. वास्तविक रूप प्रगटते. आता कसला उशीर? श्रीरामप्रभु हनुमंताला उठवतात. आपल्या हृदयाशी धरतात. दृढ आलिंगन देतात. रामप्रभूंच्या हृदयातले हनुमंताच्या हृदयी जाते. अदृश्य शक्‍ती हनुमानाच्या हृदयी प्रवेश करते. भगवान आणि भक्‍त एक होतात. भगवंताची आणि भक्‍ताची दोघांचीही एक अद्‌भुत अवस्था असते. श्रीराम हनुमंताच्या मस्तकाचे अवघ्राण करतात. हनुमंताच्या आनंदाला सीमा नसते.’

१.७ प्रत्येक रामकथेला हनुमंताची उपस्थिती

`यत्र यत्र रघुनाथकीर्तनं,तत्रतत्रकृतमस्तकाज्जलिम्।
बाष्पवारि परिपूर्ण लोचनम् मारुतिं नमत राक्षसान्तकम् ।।

राक्षसान्तक असा कठोर हृदयाचा मारुति जिथे जिथे रामकथा, रघुनाथाचे संकीर्तन सुरू असेल, तिथे तिथे हात जोडून, नतमस्तक होऊन अश्रुपूर्ण नेत्रांनी सदैव उपस्थित असतोच. सर्व हिंदुस्थानभर केव्हाही, कुठेही रामकथेला प्रारंभ होण्याआधी `रामकथा-प्रिय’ हनुमंतरायाकरता तिथे स्वतंत्र आसन, रांगोळी घातलेला पाट मांडण्याची प्रथा सहस्रश: वर्षांपासून सर्वत्र आहे.  रामकथा श्रवणाकरता, मारुतीराय हा वृद्ध ब्राह्मणरूपाने तिथे उपस्थित रहातो. कथेच्या प्रारंभापूर्वी तो येतो आणि कथा संपल्यावर सर्वात शेवटी तो तेथून जातो. यासंबंधीचे अनेक प्रसंग, अनेक उदाहरणे, अनेक कथा उपलब्ध आहेत.’ (ऋषिस्मृती – १)

१.८ नामावर दृढ श्रद्धा असणारा

हनुमंताची `नामच सर्वकाही करते’, अशी दृढश्रद्धा होती. विश्‍वामित्रांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी श्रीरामाने हनुमंताशी युद्ध केले. श्रीरामाने त्याच्यावर अनेक बाण सोडले; पण रामनामाच्या भक्‍तीमुळे त्याला एकही बाण लागला नाही. नामावरील श्रद्धेमुळेच तो समुद्र ओलांडून लंकेला गेला.

१.९ निष्काम प्रार्थना करणारा

श्रीरामाने अंगद यास `युवराज’ पद दिले, सुग्रीवास व बिभीषणास राज्य दिले, तसेच इतरांनाही मौल्यवान बक्षिसे दिली. हनुमंतास मात्र काहीच दिले नाही. श्रीरामाने वर मागण्यास सांगितल्यावर हनुमंताने प्रार्थना केली, `हे प्रभो, मला सदैव आपल्या चरणी स्थान मिळू दे. माझ्या हृदयात सतत आपला वास असू दे. मला आपली सेवा करता येऊ दे.’ यावरून हनुमंत किती निष्काम आहे, हे लक्षात येते.

१.१० आसक्‍ती नसणारा व वैराग्य असणारा

हनुमंताने धन, मान, देहसुख, स्त्री, राज्य व पद यांचा त्याग केला आहे. त्याला केवळ भगवंत हवा होता. जेव्हा सीतामाईने हनुमंताला सोन्याची माळ दिली, तेव्हा त्या माळेत `राम नाही’ म्हणून त्याने ती माळ तोडली होती. रामाशिवाय त्याला काहीच नको होते.

१.११ ईश्‍वरी राज्यासाठी धर्माला पाठबळ पुरवणे

हनुमानाच्या उत्पत्तीचा मूळ हेतू ईश्‍वरी राज्याची स्थापना करण्यासाठी आवश्यक प्रकट शक्‍तीचा उपयोग करून प्रकट स्वरूपात असलेल्या बाधांना दूर करून त्यांच्यापासून ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी आवश्यक अशा जिवांचे रक्षण करणे होय. यासाठी हनुमान हा प्रत्येक काळात विविध स्वरूपात प्रगट होऊन त्याचे कार्य करतो. हनुमानाचे निर्गुणातील-सगुण स्वरूपाचे कार्य कधीही थांबत नाही. हनुमानात दास्यभाव १०० टक्के असल्यामुळे तो सतत कार्य करत असतो.

  कार्य प्रमाण (टक्‍के)
१. ईश्‍वरी राज्‍यासाठी धर्माला
पाठबळ पुरवणे
३० (४०*)
२. जिवांना साधनेसाठी मदत करणे ३० (२०*)
३. अनेक जिवांना मुक्‍ती देणे २०
४. सेवकाचा आदर्श ठेवणे २०
  एकूण १००
* वाईट शक्‍तीने मधेच सांगितलेली चुकीची माहिती

१.१२ सेवकाचा आदर्श ठेवणे

हनुमानाने स्वत:चे उदाहरण सर्वांसमोर आदर्श सेवकाचे ठेवले आहे. त्यामुळे अनेक जिवांनी हनुमानाच्या दास्यत्वाचे पालन करून मोक्षप्राप्‍ती केली. हनुमानात १०० टक्के दास्यत्व असल्यामुळे तो अविरत आणि अखंडपणे सेवा करू शकतो. हनुमानाच्या दास्यत्वामुळेच त्याला रावणासमोरही श्रीरामाच्या गुणांचे वर्णन करता आले आणि रावणाद्वारे श्रीरामाची विटंबना केल्यावर पूर्ण लंकेला आग लावून निघता आले.  – धर्मतत्त्व

१.१३ अंत:करणातील मारुतीकडून होणारे सूक्ष्म स्तरावरील कार्य

  • नामजप: अंत:करणातील मारुतीच साधना करण्याबाबत व श्रीरामाचे नाव घेण्याबाबत जिवाच्या मनात विचार घालत असतो.
  • सत्संग: मारुतीच्या मनात सतत भगवंताला भेटण्याची निस्सीम ओढ असते. भगवंताच्या भेटीसाठी व्याकूळ झाल्यावर मारुति राममंदिरात किंवा रामायणातील कथाकथन होत असलेल्या स्थळी किंवा रामभक्‍ताच्या शोधास बेभान होऊन जातो. त्याचप्रमाणे प्रभूच्या भेटीची ओढ अंत:करणातील मारुतीत निर्माण झाल्यावर जिवाच्या मनात भगवंत किंवा गुरु यांना भेटण्याची तीव्र उत्कंठा निर्माण होते. प्रत्यक्ष भगवंतरूपी गुरु जरी भेटले नाहीत, तरीही जिवाला साधना करणार्‍या जिवांच्या सत्संगात जावेसे वाटते व तो सत्संगाला जाऊ लागतो.
  • सत्सेवा: मारुतीला भगवंताबाबत निस्सीम प्रेम वाटत असल्याने तो सतत भगवंताच्या सेवेत मग्न असतो. त्याच्यातील दास्यभाव क्षणोक्षणी जागृत असतो. भगवंतावरील प्रेमापोटी जेव्हा एखादा जीव तळमळतो, तेव्हा त्या जिवावर मारुति कृपा करतो. त्यामुळे मारुतीतील दास्यभाव जिवामध्ये जागृत होऊ लागतो व जिवाला प्रभूच्या चरणांची सेवा करण्याची इच्छा निर्माण होऊन त्यानुरूप तो सेवेची संधी शोधू लागतो.
  • प्रीती: भगवंताबाबतच्या प्रीतीमुळे मारुतीला चराचरात, म्हणजे प्रत्येकात श्रीरामाचे दर्शन होते व तो सर्वांना रामस्वरूप मानून त्यांची सेवा करत असतो. इतरांची सेवा करून तो श्रीरामाच्या व्यापक रूपाचीच भक्‍ती व सेवा करीत असतो. जिवामध्ये जेव्हा भगवंताला भेटण्याची इच्छा जगण्याच्या इच्छेपेक्षाही प्रबळ होते, तेव्हा तो चातकासारखा तळमळू लागतो. त्याला मारुतीप्रमाणे चराचरात भगवंताचे दर्शन होऊ लागते व त्याच्यात सर्व जिवांप्रती प्रीती निर्माण होते.
  • धर्माचरण: मारुति प्रत्येक क्षणी प्रभू श्रीरामाची भक्‍ती करून कठोर धर्माचरण करीत असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामाची शक्‍ती संक्रमित होऊन ती आवश्यक तेव्हा आपोआप कार्यरत होत असते. धर्माचरणाचे बळ प्राप्‍त झालेल्या मारुतीची पूजा करणे व त्याची उपासना करणे, यामागे `त्याच्यासारखे भक्‍तीचे आचरण करून धर्मबळ प्राप्‍त व्हावे’, हा मुख्य उद्देश आहे. धर्मबळ असल्यामुळे दुर्जनांना मारुतितत्त्वाच्या अस्तित्वामुळे त्रास होतो. पाताळ तसेच भुवलोक येथे रहाणार्‍या लहान-मोठ्या सर्वच वाईट शक्‍तींवर मारुतीच्या अस्तित्वातून प्रक्षेपित होणारी मारक शक्‍ती व चैतन्य यांचा परिणाम होतो व वाईट शक्‍तींचे बळ कमी होते. ज्या जिवाच्या अंत:करणात प्रीती उत्पन्न झालेली असते, त्याच्याकडून मारुतीप्रमाणे क्षणोक्षणी भक्‍ती होऊ लागते व त्यालाही मारुतीप्रमाणेच धर्मबळ व भक्‍तीचे बळ प्राप्‍त होते. या बळामुळे स्थूल व सूक्ष्म स्तरांवरील सर्व प्रकारच्या हल्ल्यांना जीव सामोरे जाऊ शकतो. 
  • रामराज्याची स्थापना: ज्या जिवामध्ये भक्‍ती जागृत झालेली असते, त्याच्याच अंत:करणात रामराज्याची स्थापना होते व असा जीवच बाह्य रामराज्याची स्थापना करू शकतो. आपल्याला ईश्‍वरप्राप्‍तीच्या तळमळीने तीव्र साधना करून स्वत:तील मारुतीला प्रगट करावे लागेल, तरच अंतर्बाह्य रामराज्याची स्थापना होईल !  – ईश्‍वर

१.१४ हनुमान हातात डोंगर घेऊन उडतांना दिसणे व येत्या काळात साधकांना होणार्‍या शारीरिक त्रासांवर उपचार करण्यासाठी औषधी तयार करण्याच्या कामगिरीवर निघाल्याचे त्याने सांगणे 

२१.५.२००५ रोजी सायंकाळी ७.०५ वाजता श्रीरामाची आरती करत असतांना हनुमान हातात डोंगर घेऊन उडतांना दिसला. त्या वेळी मी मारुतिरायाला विचारले, `हा डोंगर घेऊन कोठे निघालात?’ त्या वेळी तो म्हणाला, `प्रभू श्रीरामचंद्रांनी मला येत्या काळात साधकांना होणार्‍या शारीरिक त्रासांवर उपचार करण्यासाठी औषधी तयार करण्याची सेवा दिली आहे. मी त्या कामगिरीवर निघालो आहे.’ – श्रीमती प्रीती

१.१५ मारुतीचा आदर्श समोर ठेवून आत्मबळ वाढवून साधकांनी अंतर्बाह्य लढा देण्यास सज्ज व्हावे!

आत्मबळ वाढणे, म्हणजे साधकातील आत्मतत्त्व, म्हणजेच ईश्‍वरीतत्त्व जागृत होणे होय. आत्मतत्त्व हे सर्वगुणसंपन्न व सर्वशक्‍तीमान आहे. आत्मतत्त्वाच्या आधारे साधक स्थूल व सूक्ष्म स्तरांवरील लढा सहजपणे देऊ शकतो. `हे युद्ध लढणारा मी नसून ईश्‍वरच आहे’, याची साधकाला सातत्याने जाणीव झाल्यावर त्याच्या माध्यमातून साक्षात ईश्‍वरच कार्य करतो. ईश्‍वराच्या कार्यात ईश्‍वरच सहभागी असतो. `मी काहीही करत नाही’, ही जाणीव जितकी तीव्र असेल, तितके साधकाच्या माध्यमातून ईश्‍वरी तत्त्व अधिक प्रमाणात प्रकट होते. आत्मबळ वाढल्यावर साधकाला दुर्जन व वाईट शक्‍ती यांच्याशी एकाच वेळी लढण्याची क्षमता प्राप्‍त होते. याचाच अर्थ साधकाचा अहं, म्हणजेच कर्तेपणाची जाणीव कमी होणे आवश्यक आहे. `मी करत नसून ईश्‍वरच करत आहे. माझ्या ठिकाणी आत्मतत्त्व आहे. ईश्‍वर आहे’, असा भाव प्रत्येक क्षणी जागृत असणे अत्यंत आवश्यक आहे.  यासाठी मारुतिरायाचे उदाहरण सर्वांना प्रेरणादायी ठरेल. `प्रत्येक कर्म माझे प्रभू श्रीराम करतात’, असा भाव ठेवून मारुति प्रत्येक कर्म अचूक व परिपूर्ण करायचा. त्यामुळे त्याचे प्रत्येक कर्म उत्कृष्ट होत होते व कर्तेपण श्रीरामाकडे जात होते. `अहंशून्यता व नितांत शरणागतभाव’ या गुणांमुळे मारुतीच्या माध्यमातून श्रीरामाची प्रचंड शक्‍ती कार्यरत झाली व मारुतीकडून क्षात्रधर्म साधना, तसेच ईश्‍वरी राज्याची स्थापना, म्हणजेच रामराज्याची स्थापना हे अतिशय अवघड कार्य होऊ शकले.  मारुतीचा आदर्श समोर ठेवून साधकांनी स्वत:चे आत्मबळ वाढवावे. त्यासाठी ईश्‍वरावरील श्रद्धा व त्याच्या प्रतीचा शरणागत भाव वाढवावा आणि निर्भयपणे ईश्‍वराच्या आज्ञेचे वेळोवेळी पालन करावे. असे केले तरच साधक अंतर्बाह्य लढा यशस्वीरीत्या देऊ शकेल!  – ईश्‍वर